मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवांपैकी एक महत्त्वाचा उत्सव आहे. या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई, पुण्यावरुन कोकणात जातात. त्यामुळं गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळानं यंदा 5000 एसटीच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. दरम्यान, गणपती उत्सवाच्या जादा बसेस वाहतुकीच्या धरतीवर आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि संबधित अधिकारी उपस्थिती होते.
गणपती उत्सव म्हणजे कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. गणपतीचा सण, कोकणचा चाकरमानी आणि एसटीचं एक अतुट नातं आहे. त्यामुळं प्रत्येक वर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या-तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. त्यामुळं यंदाही या सणासाठी साधारण 5000 जादा एसटीच्या बसेस कोकणातील रस्त्यावर धावतील, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दरम्यान, या गाड्यांचं आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर करता येणार आहे. तसंच बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation या अॅपद्वारे देखील आरक्षण करता येणार आहे.
दुसरीकडे, गेल्यावर्षी 4300 जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. यानंतर यावर्षी 5000 जादा बसेस गाड्या सोडण्यात येणार आहेत. आषाढी एकादशीच्या वारीसाठी एसटी महामंडळानं 5200 जादा बसेस सोडल्या होत्या. उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं आता गणपती उत्सवासाठी एसटीने तब्बल 5000 जादा बसेस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 23 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे आणि पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, 22 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे. यात महिला व ज्येष्ठांना सवलत असणार आहे. जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणासह गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षण 22 जुलैपासून सुरू होणार आहे.