सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 शहर

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार , घराणेशाही विरोधात प्रामाणिक युवक निवडणुकीत उभे करणार : आम आदमी पार्टी

गजानन मेनकुदळे    16-07-2025 15:24:57

पुणे : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण, गट रचनेचे प्रारूप जाहीर झाल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या, पालिकांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. 

पुणे जिल्ह्यात 73 गट आणि 146 गण निश्चित केलेले आहेत. या सर्व जागांवरती आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे लढणार असून त्यासाठी उमेदवार निश्चिती प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आज सांगण्यात आले. या जिल्ह्यात अनेक वर्षे केवळ सतरंज्या उचलणारे परंतु प्रामाणिक आणि कष्टाळू राजकीय कार्यकर्ते आहेत. नवीन पर्याय देत असताना केवळ प्रस्थापित घराणेशाहीमुळे अनेक वर्षे कुठलीही निवडणूक लढवू न शकणाऱ्या अनेक प्रामाणिक राजकीय कार्यकर्त्यांना ही संधी असेल. सहकारी संस्थांच्या आर्थिक नाड्या हातात ठेवून राजकारण करणाऱ्या, केवळ सत्तेसाठी पक्ष बदलत राहणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना आम आदमी पार्टीच्या पुणे जिल्ह्यातील प्रवेशामुळे धक्का बसू शकतो. पंजाब , दिल्ली प्रमाणे सामान्य माणसाचा विकास, शिक्षण, आरोगी सुविधा, हाताला काम, योग्य दाम, भ्रष्टाचाराची पोलखोल  हा निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू असेल असे मुकुंद किर्दत यांनी संगितले. 

ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आज दहा वर्षांपूर्वीचा भाव सुद्धा मिळत नाही. त्यातच दूध उत्पादक शेतकरी व इतर संलग्न व्यवसाय सुद्धा अडचणीत आहेत. जिल्ह्यात सरकारी शाळांचा दर्जा सुमार आहे आणि आरोग्य व्यवस्था पूर्णपणे सलाईनवर आहे. पुणे जिल्हा सोयीप्रमाणे निष्ठा बदलणार्‍या भ्रष्टाचारी नेत्यांमुळे काही तालुके अविकसित मागास ठरतील अशी स्थिति आहे. व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टी करेल असे पुणे जिल्हा (पूर्व,दक्षिण) अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी सांगितले. 

स्मार्टमीटरला विरोध , विस्थापित पीडितांना न्याय, आदिवासींना मूलभूत सुविधा यावर जुन्नर, आंबेगाव, मावळ भागात पक्ष काम करीत आहे.  ग्रामीण भागामध्ये पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या चारित्र्यवान कार्यकर्त्यांना या निवडणुका मार्गे प्रथमच संधी दिली जाईल. त्याचबरोबर सामाजिक प्रश्नाची जाण असणारे नवीन तरुण चेहरे देण्याचा पक्ष प्रयत्न करेल. राजकारण हा पैसे कमवण्याचा व्यवसाय नसून सामाजिक काम आणि बदल घडवण्याचे माध्यम आहे असा विचार करणाऱ्या युवकांना पक्षांमध्ये सामील होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले तसेच लोकांच्या देणगी मधून ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती पुणे जिल्हा ( पश्चिम,उत्तर) अध्यक्ष वैभव टेमकर यांनी दिली.यावेळी आप चे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कड ,वैभव टेमकर तसेच शिवाजी कोलते, सुनील सवदी ,सुभाष करांडे आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती