लातूर – लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना अखेर पदावरून हटवण्यात आले. अजित पवार यांनी त्यांना तातडीने राजीनामा देण्याचे आदेश दिले. चव्हाण हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जात असून, या कारवाईला मोठे राजकीय महत्त्व आहे. लातूर घटनेनंतर मराठा संघटनांचा वाढता रोष आणि आगामी निवडणुकांचा विचार करता, पक्षाच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
लातूरमध्ये घडलेल्या गंभीर आणि निषेधार्ह मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने तात्काळ कठोर पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात सूरज चव्हाण यांचे नाव पुढे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या मूल्यांविरोधातील कोणतेही वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा ठाम संदेश अजित पवार यांनी यानिमित्ताने दिला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पक्षाच्या शिस्तीबाबत अजित पवार यांनी दाखवलेली ही भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.
अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सुचना
'काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या', असं अजित पवारांनी म्हटलंय.