मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ 'एक्स'वर शेअर केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यावर बोलताना माणिकराव कोकाटे यांनी मी युट्युब बघत असताना रमी गेमची आलेली जाहिरात स्किप करत होतो, असे स्पष्टीकरण दिले होते. एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. तर कोकाटेंनी जाहिरात आली होती असं सांगितलं. यानंतर आमदार जितेंद्र आव्हाडांनी पोलखोल केली. 'मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय...!', असं आव्हाडांनी म्हटलंय.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर म्हटले आहे की, एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे. प्रश्नोत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते, जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा... कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.