यवतमाळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त पुसद तालुक्यातील 65 जिल्हा परिषद शाळांमध्ये वृक्षारोपण करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. या अंतर्गत शाळांमध्ये वड, पिंपळ, लिंब, करंज यांसारख्या निसर्गोपयोगी वृक्षांची लागवड करत पर्यावरण संवर्धनाचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला.
या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, पर्यटन, आदिवासी विकास, मृदा व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वतः पुढाकार घेत पुसद तालुक्यातील 65 पैकी 2 शाळांमध्ये वृक्षारोपण केले. त्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वनवारला आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव या शाळांचा समावेश आहे. त्यांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधत निसर्गाच्या समतोलाविषयी जागरूकता निर्माण केली.
“वाढदिवस साजरा करण्याची ही एक प्रेरणादायक पद्धत आहे. प्रत्येकाने यावर्षी किमान एक तरी वृक्ष लावून तो जगवावा,” असे आवाहन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी उपस्थितांना केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील उर्वरित 63 शाळांमध्येही मोठ्या उत्साहात वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पडले. पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्या घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या या अभिनव उपक्रमामुळे पुसद तालुक्यात पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश गेला असून, ‘झाड लावा – झाड जगवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा आदर्श या माध्यमातून घालून दिला गेला आहे. या उपक्रमाचे यश सुनिश्चित करण्यासाठी पंचायत समिती पुसदचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी सर्व बीएआरसी कर्मचारी सर्व केंद्रप्रमुख आणि 65 शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.