दौंड : दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे व्यक्ती कोण आहेत हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
ही घटना दौंडमधील एका खाजगी कलाकेंद्रात घडली आहे. घटनेनंतर पीडित तरुणी रुग्णालयात उपचार घेत आहे. ती खूप घाबरलेली आहे असून तिच्यावर दबाव टाकल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. तसेच कलाकेंद्र चालवणाऱ्या मालकाने गोळीबार झाला नसल्याचा दावा केला आहे. मात्र जिल्ह्यातीलच एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाकडून हे कृत्य करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. या घटनेबाबत यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळबाराची माहिती प्रात्प झाली आहे. मात्र, अद्याप काही सबळ पुरावा हाती लागलेला नाही. संबंधित कला केंद्र मालकाने काही घडले नसल्याचे सांगितले आहे. पण सीसीटीव्ही फुटेजनंतर खरी माहिती समोर येईल.
लावणीवरुन २ गटात राडा
चौफुला परिसरात ३ कला केंद्र आहेत, गाणी, नृत्य, लावणी अशा काल येथे सादर केल्या जातात. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे कला केंद्रामध्ये कार्यक्रम सुरु होते. मात्र, दोन गटांमध्ये नृत्य सादर करण्यावरुन बाचाबाची झाली. त्यातूनच गोळीबार झाला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अधिक तपासासाठी पोलिसांनी तिन्ही ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेत जप्त केले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कलेच्या नावाखाली या केंद्रांमध्ये अनेक प्रकार सुरु असतात. मद्यपान करुन रात्री-अपरात्रीपर्यंत धिंगाणा सुरु असतो. मात्र, पोलीस याकडे दुर्लक्ष करतात.
रोहित पवार यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केली आहे. "दौंडमध्ये सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार केला. यात एक तरुणी जखमी झाली आहे. पोलीस यंत्रणा सत्य शोधण्याऐवजी दबावामुळे प्रकरण दाबत आहे. दोषींवर कारवाई होणार की त्यांना मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’" असं त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला आहे. तसेच, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच, आमदाराच्या भावाने गोळीबार केला. ज्यात एका महिलेला इजा झाली आहे. पोलीस माहिती लपवत असतील, तर हे योग्य नाही. आरोप खरे ठरल्यास माहिती लपवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. पीडित महिलेवर आणि पोलिसांवर दबाव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.