श्रीनगर : सोमवारी श्रीनगरच्या लिडवास भागात सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत मोठी कारवाई करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा याच्यासह अन्य दोन टीआरएफ दहशतवाद्यांना ठार मारले. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून, सैन्याला यात मोठे यश मिळाल्याचे समोर आले आहे.
लिडवास हा श्रीनगरच्या बाहेरील घनदाट जंगलाचा भाग असून, हा परिसर डोंगराळ मार्गाने त्रालशी जोडलेला आहे. याठिकाणी यापूर्वीही टीआरएफच्या दहशतवादी कारवायांची नोंद झाली होती. सैन्याच्या चिनार कॉर्प्सच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या भागात शोध मोहीम सुरू असतानाच दहशतवादी सापडल्याने झपाट्याने कारवाई करण्यात आली.
सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तिघांनाही ठार करण्यात आले असून, यामध्ये प्रमुख म्होरक्या मुसा याचा समावेश आहे. या कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, श्रीनगरजवळील दाचिगम जंगलाच्या वरच्या भागात सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त कारवाई सुरूच आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे जानेवारी महिन्यात टीआरएफचा एक लपलेला अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी या भागात संशयास्पद हालचाली दिसून आल्याने सुरक्षाबलांनी शोधमोहीम गतीमान केली होती.