रशिया : रशियामध्ये आज सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 8.7 इतकी नोंदवली गेली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यूएसजीएसच्या मते, भूकंप समुद्राखाली झाला होता, त्यानंतर जपान आणि अमेरिकन संस्थांनी त्सुनामीचा इशारा दिला आहे. भूकंप समुद्राच्या उथळ भागात झाल्यामुळे त्सुनामी आणि जोरदार भूकंपाचे झटके बसण्याची आणखी शक्यता वाढली आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.भारतीय वेळेनुसार 30 जुलै सकाळी 4:54 वाजता आलेल्या या भूकंपाने संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाची नोंद इतिहासातील आठव्या सर्वात मोठ्या भूकंपांपैकी एक म्हणून झाली आहे.
त्सुनामीचा धोका वाढला!
या भूकंपानंतर अमेरिका, जपान, कोरिया, आणि पॅसिफिक किनारपट्टीच्या देशांमध्ये त्सुनामी अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हानीचा अंदाज सुरू...
सध्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र कॅमचटकाच्या पूर्वेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यापासून सुमारे 136 किलोमीटर अंतरावर, पेट्रोपावलोव्स्क-कॅमचत्स्कीच्या आग्नेयेला होते. भूकंपाची खोली 18.2 किलोमीटर इतकी होती, ज्यामुळे त्याची तीव्रता अधिक जाणवली.
प्रशांत आणि ओखोत्स्क समुद्राच्या प्लेट्सचे एकत्र आल्यामुळे हा भुकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. ही प्रक्रिया कुरिल-कॅमचटका खंदकामध्ये घडते. 20 जुलै रोजी याच परिसरात 7.4 तीव्रतेचा एक छोटा भूकंप (फॉरशॉक) झाला होता, तर मुख्य भूकंपापाठोपाठ 7.0 तीव्रतेचा आफ्टरशॉकही नोंदवला गेला.
अमेरिकेच्या अलास्कामध्ये असलेल्या राष्ट्रीय त्सुनामी चेतावनी केंद्राने अलास्का अलेउतियन द्वीपसमूहांच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. याव्यतिरिक्त, कॅलिफोर्निया, ओरेगन आणि वॉशिंग्टन तसेच हवाई या अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांवर त्सुनामीची देखरेख ठेवली जात आहे.