पुणे : 'जीविधा' या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत संस्थेच्या वतीने आयोजित ३ दिवसीय हिरवाई महोत्सवाचा समारोप १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी झाला.महोत्सवाचे हे १७ वे वर्ष होते. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आयसर संशोधन संस्थेतील डॉ. सागर पंडित यांनी वनस्पतींच्या रासायनिक संवादाविषयी माहिती दिली. ते म्हणाले ,'वनस्पती व प्राणी जगतात संवाद असतो. तसेच वनस्पती इतर वनस्पतींशी संवाद साधतात. प्राणी वनस्पतींकडून फळे, फुले, फुलांतील मकरंद, गवत, पाने व कोंब खातात. राहण्यासाठी आसरा मिळवतात. तर वनस्पती परागीकरण व बीज प्रसारासाठी प्राण्यांचा वापर करतात. तरीही सर्व प्राणी वनस्पतींसाठी उपयुक्त नसतात. यातून बचावाचे युद्ध सुरू होते. वनस्पती त्यांच्या शरीरात धोकादायक रसायने तयार करतात किंवा काट्यासारखी शस्त्रे निर्माण करतात. त्यावर प्राण्यांमधील काही जाती प्रतिकात्मक उपाय शोधूतात व त्या वनस्पतीला खाऊ शकतात. हे चालू आहे व यातूनच वनस्पती व प्राण्यांची उत्क्रांती होत आहे'.
प्राणी जगतातील सस्तनप्राणी व पक्षी आवाज करतात. पण वनस्पती व सुक्ष्मजीव यांना स्वरयंत्र नाही. त्यामुळे ते आवाज काढू शकत नाही. तरीही यांच्यात संवाद होतो. संवाद होतो म्हणजे निरोपाची देवाणघेवाण होते. हे निरोप पाठवण्यासाठी रंग व वास यांचा वापर होतो. या दोन्ही गोष्टी शरीरातील रसायनांच्या साह्याने साध्य केल्या जातात, हे डॉ सागर पंडित यांनी केलेल्या अनेक संशोधनात्मक प्रयोगांपैकी काही उदाहरणे देऊन सांगितले.
पुणे इंजिनिअरिंग काॅलेज चे प्राध्यापक डॉ महेश शिंदीकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जीविधा संस्थेच्या वृंदा पंडित यांनी प्रास्ताविक केले. जीविधा संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित यांनी हिरवाई महोत्सवाचा आयोजन करण्यामागची जीविधाची भूमिका स्पष्ट केली तसेच आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.