पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांसाठी मोठी घोषणा केली आहे. पोलीस दलाच्या भविष्यासाठी आपण ६० वर्षानंतर एक नवीन आराखडा तयार केला असल्याचे फडणवीस यांनी पुण्यात बोलताना सांगितले. तसेच, ५ नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात येतील आणि त्यासाठी किमान १००० पोलिसांचे अतिरिक्त बळ पुरवण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराच्या सुरक्षेसाठी आणि पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी एक मोठी घोषणा केली आहे. पुण्यामध्ये 5 नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात येतील आणि त्यासाठी किमान 1000 पोलिसांचे अतिरिक्त बळ पुरवण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच, पुण्याला 2 नवीन पोलीस उपायुक्त देण्याची मागणीही लवकरच मान्य केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज मला आनंद होत आहे की बरोबर 10 वर्षांपूर्वी आपण CCTV फेज 1 चं उद्घाटन केलं होतं. पुणे शहर ज्या वेगाने विस्तारत आहे. त्यानुसार आपण त्यात सातत्याने भर घालत गेलो आहोत. आज पुणे शहर पोलिसांकडे देशभरातील सर्वात अत्याधुनिक CCTV प्रणाली आहेत. ज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) जोड देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे एखादा गुन्हेगार गुन्हा करून पसार झाला, तर 1 मिनिटात हजारो CCTV स्कॅन करून त्याला पकडणे शक्य आहे. 'बचके रहना रे बाबा' हे जुनं गाणं आता पुणे पोलिसांमुळे सत्यात उतरलं आहे, असेही ते म्हणाले.
पोलीसांसमोराची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेवून ६० वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरोन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे. यापुढेही पोलस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच पोलीस स्टेशनची मागणी केली असून त्यास मंजुरी देण्यात येईल. त्यासाठी लागणाऱ्या एक हजार मनुष्यबळाला मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली आहे.
पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे आयोजित पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि नवीन उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपर मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रजंन कुमार शर्मा आदी उपस्थित होते.
पोलीस दलाच्या भविष्यासाठी आपण 60 वर्षानंतर एक नवीन आराखडा तयार केला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आधुनिक पोलिसिंगसाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व या आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. याच सर्व गोष्टींचा आढावा घेऊन पुणे पोलिसांची मागणी मान्य करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची 5 नवीन पोलीस स्टेशन आणि 2 नवीन DCP ची मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
संभाव्य नवीन पोलीस ठाणी आणि त्यांचे विभाजन
- विमानतळ पोलीस ठाण्यातून लोहगाव पोलीस ठाणे
- येरवडा पोलीस ठाण्यातून लक्ष्मीनगर पोलीस ठाणे
- सिंहगडरोड पोलीस ठाण्यातून नऱ्हे पोलीस ठाणे
- कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून येवलेवाडी पोलीस ठाणे
- हडपसर पोलीस ठाण्यातून मांजरी पोलीस ठाणे