सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 राज्य

‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी

डिजिटल पुणे    28-08-2025 18:46:31

मुंबई : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.

या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर यांचा संयुक्त सहभाग राहणार आहे. याशिवाय मोठ्या संख्येने गणेश मंडळे या उपक्रमात सक्रिय सहभागी झाली आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे.

नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता

शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार असून, तपासणी दरम्यान आजार आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचार संबंधित योजनांतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचा उद्देश फक्त तपासणीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्यावतीने गणेश मंडळांशी संपर्क साधून भव्य आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, स्थानिक वैद्यकीय महाविद्यालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम सक्रिय सहभागी झाले आहेत.

गणेशमंडळांकडून व्यापक जनजागृती

नागरिकांना या उपक्रमाची माहिती मिळावी यासाठी मागील आठवडाभर गणेश मंडळांकडून बॅनर, पत्रकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती सुरू आहे. परिणामी या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि भाविक पुढे येत आहेत. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे.

गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री फडणवीस यांची अभिनव कल्पना आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत आहे. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार आहेत. हा उपक्रम म्हणजे आरोग्यसेवेतील लोकाभिमुख आणि जनहिताचा उत्तम आदर्श ठरत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.


 Give Feedback



 जाहिराती