नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बु. येथील शेतामध्ये वीज पडून २७ ऑगस्ट रोजी वंदनाताई प्रकाश पाटील व त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील तसेच शेतात काम करणाऱ्या मदतनीस निर्मलाताई रामचंद्र पराते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील व पराते कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेतील मृतांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शासनाच्या निकषानुसार मृत पाटील व पराते कुटुंबियांना आर्थिक मदतीचा मदतीसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत लाभ देण्यात आले. यावेळी आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे आदी उपस्थित होते.
घडलेली घटना दुर्देवी असून कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, काळाचा मोठा घाला कुटुंबियांवर झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 24 तासांच्या आत कुटुंबातील व्यक्तीला मदत देण्यात आली आहे. पराते कुटुंबियांच्या खात्यावर तत्काळ निधी जमा करण्यात आला असून पाटील कुटुंबियांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी म्हटले.