पुणे – गणेशोत्सवाच्या पारंपरिक वातावरणात यंदा सोमवार पेठेतील पलरेचा कुटुंबाने ऐतिहासिक वारसा जपत आगळावेगळा उपक्रम साकारला आहे. गणेशोत्सव म्हटला की प्रत्येक मंडळ, कुटुंब आपापल्या पद्धतीने सजावट करतात. यंदा सोमवार पेठेतील पलरेचा कुटुंबाने ऐतिहासिक वारसा जपणारी अनोखी सजावट साकारली आहे. “ऐतिहासिक वाडा – विश्रामबाग वाडा” या थीमवर त्यांनी अनोखी सजावट केली असून, पाहणाऱ्यांना पेशवाईच्या वैभवशाली काळाची अनुभूती देणारी ही रचना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही सजावट पाहण्यासाठी परिसरातील गणेशभक्तांची गर्दी होत आहे.

या सजावटीसाठी तब्बल २० ते २५ दिवसांचा कालावधी लागला असून, कार्डबोर्डचा वापर करून ५ फूट रुंदी, ४ फूट लांबी आणि ३.५ फूट उंचीची भव्य रचना उभारण्यात आली आहे. या उपक्रमासाठी ७ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.

विश्रामबाग वाडा हा पुण्याच्या ऐतिहासिक वारशातील एक महत्वाचा वाडा असून, पेशवाईच्या वैभवाचे प्रतीक मानला जातो. या वाड्याची झलक आपल्या घरच्या गणपतीच्या सजावटीत आणण्याचा पलरेचा कुटुंबाचा हा प्रयत्न पाहुण्यांना जुना वैभवशाली काळ अनुभवायला लावतो.
फक्त सजावटच नाही, तर गणपतीची मूर्ती देखील विशेष आहे.पर्यावरणपूरकतेलाही प्राधान्य देत ही मूर्ती पूर्णपणे शाडूमातीपासून तयार करण्यात आली असून, ती पुण्यातील दीप्ती आर्ट स्टुडिओ, रस्ता पेठ येथे बनवण्यात आली आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना प्रज्वल पलरेचा म्हणाले,गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा उत्सव आहे. “गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण आपल्या वारशाची आठवण ठेवावी आणि पर्यावरणपूरक उपक्रम करावा, यासाठी आम्ही ही थीम निवडली. पूर्ण सजावट कार्डबोर्डने केली आहे, जेणेकरून प्लास्टिकचा वापर होणार नाही.” म्हणून यंदा आम्ही वारशाची आठवण करून देणारी आणि पर्यावरणपूरक अशी सजावट करण्याचा संकल्प केला.”
