मुंबई : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीने खा. संजय राऊत यांना पुरते उघडे पाडले. उबाठा, राऊत आणि युपीएला आरसा दाखवणारी अशी ही निवडणूक होती. एनडीएची मते फुटून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीएची सरशी होईल असा डंका वाजवणाऱ्या राऊतांना निकालानंतर ‘जोर का झटका’ बसला. निकालानंतर एनडीए आणि युपीए मध्ये तब्बल 150 मतांचा फरक समोर आला. उबाठाच्या खासदारांनीच उबाठा आणि तुमच्यावर काडीमात्र ही विश्वास ठेवला नाही. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा शर्ट ओढता-ओढता राऊतांची काय अवस्था झाली, असा बोचरा सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुरते उघडे पडूनही आमची इज्जत शाबूत आहे असा केविलवाणा दावा श्री. राऊत करत आहेत हे हास्यास्पद असल्याचेही श्री. बन यांनी नमूद केले.
यावेळी श्री. बन म्हणाले की, राहुल गांधींचं नेतृत्व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पुरते निष्प्रभ ठरले आहे. युपीएच्या खासदारांनीच क्रॉस व्होटिंग करून आपली खदखद व्यक्त केली. यातली सगळ्यात मोठी गंमत म्हणजे महाराष्ट्रातून एनडीएला सर्वाधिक साथ मिळाली. हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचं आजचे सत्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उचलली जीभ लावली टाळ्याला अशा आवेशात टीका करताना, 2019 मध्ये उबाठा आणि श्री. राऊत यांनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसूनही देवेंद्रजी पुन्हा उभे राहिले हे श्री. राऊत यांनी लक्षात ठेवावे असे खडसावले. विधानपरिषद, राज्यसभा आणि आता उपराष्ट्रपती निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने देवेंद्रजींच्या नेतृत्वाची झलक पाहिली आहे. त्यांची जादुई कांडी, त्यांचा करिष्मा, आणि त्यांची धोरणात्मक अचूकता पुन्हा पुन्हा दिसून आली. श्री. राऊत तुम्हाला राज्यसभेत केवळ अर्ध्या मताने आघाडी मिळाली होती यांची जाणीव ठेवा, आणि पुढील तीन वर्षांत तुम्हाला पुन्हा राज्यसभा मिळणार नाही, हे ही सत्य स्विकारा असाही टोला श्री. बन यांनी लगावला.
नेपाळसारखे अराजक माजावे हीच राऊतांची इच्छा ?
देशात नेपाळसारखे अराजक माजेल असे भविष्य वर्तवणारे राऊत हे खंडोजी खोपड्याचे वारसदार आहेत का? जसा खोपडे स्वराज्यात द्रोह करून गेला, तसेच महाराष्ट्रद्रोह आणि देशद्रोहाचे बीज तुम्ही रोवताय का? असा खणखणीत सवाल श्री. बन यांनी विचारला. हा देश स्वामी विवेकानंदांचा, महात्मा गांधींचा, आणि आज सक्षम नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदीजींचा आहे. येथे कधीही अराजकता माजणार नाही. खरं तर, जे तुमच्या मनात आहे तेच तुमच्या ओठावर आलं. भारताला नेपाळसारख्या अस्थिरतेत ढकलण्याची तुमची सुप्त इच्छा आहे का? असा प्रश्न विचारत महाराष्ट्र आणि भारत इतके सक्षम आहेत की, तुमचे हे कपटी डाव कधीच यशस्वी होणार नाहीत. उलट तुम्ही पेटवलेल्या आगीत तुमचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही असा इशारा श्री. बन यांनी दिला.
देशात आता Gen Z नाही, तर Gen M आहे – M for Modi!
देशातील तरुणाईचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. 2014, 2019 आणि 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक मतदान तरुणाईने केले. हीच तरुणाई म्हणजे भारताचं भविष्य, आणि ती ठामपणे मोदींसोबत उभी आहे. राऊत यांच्यासारखे आगडोंब माजवण्याचे घाणेरडे राजकारण तरुणाईला रुचत नाही, त्यांना विकास आणि स्थैर्य हवं आहे आणि हे केवळ मोदींचे सक्षम नेतृत्व देऊ शकेल हा विश्वास आहे. म्हणून कितीही वायफळ बडबड केली तरीही या देशात किंवा महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही असेही खडसावले.