नवी दिल्ली : अमरावती शहराने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावतीने ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे.दिल्लीत झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अमरावती महानगरपालिकेला ७५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
अमरावती महानगरपालिकेने स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये देशातील ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनसीएपी) अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात अमरावतीने २०० पैकी २०० गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्ति वर्धन सिंह यांच्या हस्ते अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना दिल्लीत आयोजित एका भव्य सोहळ्यात ७५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत १३० शहरांमध्ये घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अमरावतीने केलेल्या ठोस उपाययोजनांनी सर्वांचे लक्ष वेधले. शहराने रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली, ज्यामध्ये ३४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसह पदपथांची निर्मिती, ५३ उद्यानांचे हरितीकरण आणि १९ एकर ओसाड जमिनीचे घनदाट जंगलात रूपांतर यासारख्या उल्लेखनीय कामगिरीचा समावेश आहे. याशिवाय, धूळ नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, जनजागृती मोहीम आणि हरित आच्छादन वाढवण्याच्या प्रयत्नांमुळे अमरावतीने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात आघाडी घेतली.
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी हा पुरस्कार संपूर्ण अमरावतीकरांचा सामूहिक विजय असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “हा सन्मान केवळ महानगरपालिकेचा नाही, तर प्रत्येक नागरिक, स्वच्छता कर्मचारी, अभियंता आणि पर्यावरण तज्ज्ञ यांच्या अथक परिश्रमाचा परिणाम आहे. हा पुरस्कार आम्हाला भविष्यात पर्यावरणस्नेही धोरणे अधिक दृढतेने राबवण्यासाठी आणि अमरावतीला हरित शहर म्हणून नवी ओळख देण्यासाठी प्रेरणा देईल.”या सोहळ्यात इंदूर, जबलपूर, आग्रा, सूरत, झाशी, मुरादाबाद, अल्वर, देवास, परवानू आणि अंगुल या शहरांचाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान करण्यात आला. तसेच, इंदूर आणि उदयपूर यांना रामसर करारांतर्गत पाणथळ शहर म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यात आली.