पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 'कमवा व शिका' योजनेबरोबरच वर्षभरात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.अभिजीत कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे, डॉ. रमाकांत कस्पटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना डॉ. विजय घाडगे यांनी 'कमवा व शिका' योजनेची पार्श्वभूमी व कार्यपद्धती स्पष्ट केली. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी विद्यार्थी विकास मंडळातर्फे महाविद्यालयामध्ये आयोजित निर्भय कन्या अभियान व इतर महत्त्वाच्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम प्रभावीपणे राबवत असल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक करत विविध उपक्रम व योजनांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहिलेले असून यशस्वीतेसाठी प्रा. गायत्री जाधव, प्रा. शितल शेकाडे, प्रा. गणेश कटारिया, प्रा. नीलम खोमणे, प्रणित पावले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
