बीड : बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले तुडुंब भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी सर्व शासकीय, खासगी शाळा, अंगणवाडी, आश्रमशाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रौद्र रूप धारण केले आहे. पंधरा पेक्षा अधिक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आष्टी, शिरूर कासार, अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आष्टी तालुक्यात कडा नदीकाठी अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले. बचावकार्य करत एकाच कुटुंबातील अकरा जणांना वाचवण्यात यश आले आहे. अंबाजोगाई येथील राक्षसवाडीचा पाझर तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बीडमधील माजलगाव आणि मांजरा धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे, त्यामुळे नदीकाठचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने आज बीडमधील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले. बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटोदा आष्टी, शिरूर या भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला. या ठिकाणच्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. लष्कराच्या तुकड्यांनीही बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे 51 लोकांचे प्राण वाचवता आले. महिलांसह मुले व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून, सततच्या उड्डाणांद्वारे बचाव कार्य अखंडपणे सुरू आहे.
दोन दिवस 15 पेक्षा अधिक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून बीडमध्ये असलेल्या माजलगाव आणि मांजरा धरणातून अद्यापही नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. यातच पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर आज बीड मधील शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.