पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातच आता अतिवृष्टी सुरू झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विदर्भामधील सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. कापूस पीक अडचणीत आले आहे. संत्र आणि मोसंबी याची गळती सुरू झालेली आहे. कांदा पीक संपूर्ण खराब होणार आहे.पुण्यातील जवळपास ५५ महसूल मंडळे तसेच सोलापूर, बीड ,भंडारा अहिल्यानगर या जिल्ह्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात देण्याची गरज आहे.एकीकडे निवडणूकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. परंतु त्यावरती फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे ही तोंडावर बोट धरून गप्प आहेत.
दुसरीकडे अशाच पूर परिस्थितीमध्ये पंजाब मध्ये आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारने शेतकऱ्यांना तब्बल पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे. ही मागणी विरोधी पक्षात असताना अनेकजण करतात, परंतु सत्तेवर आल्यावर याची अंमलबजावणी करणारे आणि सर्वाधिक नुकसान भरपाई देणारे आम आदमी पार्टी सरकार देशातील एकमेव आहे. याच्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही ही नुकसान भरपाई हेक्टरी ५० हजार देण्याची मागणी आम आदमी पार्टी महाराष्ट्र ने केली आहे.
महाराष्ट्रात ३० मे २०२५ च्या शासन आदेशाप्रमाणे केवळ दोन हेक्टर शेतीला नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यात ही नुकसान भरपाई कोरडवाहू क्षेत्रासाठी केवळ ८५००/- रुपये प्रति हेक्टर आणि बागायतीसाठी १७ हजार रुपये प्रति हेक्टर एवढीच जाहीर झालेली आहे. ही रक्कम अत्यल्प असून यातून शेतकरी उभा राहणे अशक्य आहे. दररोज आठ आत्महत्या होणाऱ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना तग धरण्यासाठी तातडीने पंचनामे, मदत आवश्यक आहे.
दुसरीकडे अमेरिकेतून येणाऱ्या कपाशीवर ११% आयात कर मोदी सरकारने काढून टाकलेला असल्याने ऑक्टोबर मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना जाहीर हमीभावापेक्षाही साधारण दीड हजार रुपये कमी मिळतील अशी शक्यता आहे. यामुळे पीक नुकसानीचे ताबडतोब पाहणी करून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करण्याची मागणी राज्यातील विविध ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन आम आदमी पार्टी करीत असून ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.
मुकुंद किर्दत, प्रवक्ते, आम आदमी पार्टी महाराष्ट्र