मुंबई : “ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले.
राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर (४२ लाख ८४ हजार ८४६ एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. यात प्रामुख्याने खरीप शेतपिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे.