मुंबई : मुंबई – चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवाने आणि त्यासंदर्भातील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी शासनाने उडानच्या धर्तीवर आरसीएस फंडिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.मंत्रालयात चिपी – मुंबई विमानसेवा विषयी बैठक झाली. त्यावेळी श्री. राणे बोलत होते. बैठकीस सचिव संजय सेठी, विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चिपी – मुंबई विमानसेवा सुरू होणे ही सिंधुदुर्गसाठी भावनिक बाब असल्याचे सांगून मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले की, या विमानतळासाठीच्या पायाभूत सुविधाही लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने चिपी विमानतळास वेगळे महत्त्व आहे. चिपी – मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणारे सर्व परवाने एक महिन्यात घेण्यात यावेत. विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर यांनी समन्वयाने काम करावे. भविष्यात या विमानतळाला मोठे महत्त्व येणार असल्याने प्राधान्याने कामे करावीत. सुशोभीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, असे निर्देशही श्री. राणे यांनी दिले.
नवी मुंबई येथील मरिनाचे काम मार्च २६ अखेर पूर्ण करा
नवी मुंबई येथील बेलापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मरिनाचे काम येत्या मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करावे. यासाठी ठेकेदार कंपनीने नियोजन करावे. तसेच या ठिकाणी दुकानासाठी गाळे उभारून ते भाडेतत्वावर देण्यात यावेत. या कामाचे सर्व परवाने प्राप्त असल्याने हा प्रकल्प वेळेत कार्यान्वित करावा असे निर्देश श्री. राणे यांनी दिले.