मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘नवा भारत-सांस्कृतिक महासत्ता’ या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महानगरपालिकेच्या ३४५ शाळांतील ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.सांस्कृतिक कार्य विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी तीन गटांमध्ये ही स्पर्धा झाली. पहिल्या गटात इयत्ता पहिली ते चौथी, दुसऱ्या गटात इयत्ता पाचवी ते सातवी आणि तिसऱ्या गटात इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले. पहिल्या गटासाठी रंगभरण स्पर्धा, दुसऱ्या गटासाठी शिवकालीन गड किल्ले, ऑपरेशन सिंदूर, डिजिटल भारत आणि तिसऱ्या गटासाठी नवा भारत-सांस्कृतिक महासत्ता, महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, बदलता भारत हे विषय देण्यात आले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी स्पर्धेचे नियोजन केले. पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि निर्माण प्रतिष्ठानचे गुरचरणसिंग संधू यांचे सहकार्य लाभले.