उरण :उरण तालुक्यातील वशेणी गावात वाढत्या सामाजिक समस्या आणि अनावश्यक प्रथा थांबविण्यासाठी वशेणी गावात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. दारूबंदी तसेच हळदीला साडी घेण्याची प्रथा बंद करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती.
रॅलीत ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “दारूबंदी करा – समाज वाचवा”, “अनाठायी प्रथा बंद करा – समाजाला नवा दिशा द्या” अशा घोषणा देत रॅलीतून जनतेला संदेश देण्यात आला.
गावातील प्रमुख नागरिक व कार्यकर्त्यांनी भाषणातून दारूचे दुष्परिणाम व अनावश्यक प्रथा थांबवल्यास होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. गाव एकसंघ होऊन ही जनजागृती राबवल्यास समाजात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.दारूबंदी साठी गावातील पोलीस पाटील व तालुका पोलीस अधिकारी सहकार्य करत असून येत्या काही दिवसात कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आश्वासीत केले आहे.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, रॅलीमुळे गावात सामाजिक जागरूकतेची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायत सरपंच अनामिका म्हात्रे व सर्व ग्रामपंचायत सहकारी सदस्य उपस्थित होते.