मुंबई : रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून राज्यातील डॉक्टरांनी संप मागे घेण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची वैद्यकीय संघटनेची परंपरा पुढे चालू ठेवावी, अशी अपेक्षाही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन यांना आवाहन करताना मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, विधी व न्याय विभाग व महाधिवक्ता यांच्या अभिप्रायास अनुसरुन, आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (CCMP) उत्तीर्ण करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील अनुसूचीच्या नोंद २८ करिता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने स्वतंत्र नोंदणी पुस्तक ठेवून दि. २५.०६.२०१४ रोजीच्या शासन अधिसूचनेन्वये केलेल्या सुधारणेची अंमलबजावणी, रिट याचिका क्र.७८४६,७८४७/२०१४ मधील दि.१४.०३.२०१६ चे अंतरिम आदेश व याचिकेच्या अंतिम निर्णयांच्या अधीन राहून करण्याबाबत दि.०५.०९.२०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेस निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत उच्च न्यायालय जो अंतिम निर्णय देईल त्याप्रमाणे राज्य शासन पुढील कार्यवाही करेल. यावास्तव राज्यातील सर्व आरोग्य सेवा सुरळीत चालु राहण्यासाठी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.