मुंबई : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या (MSACS) कार्याचा सविस्तर आढावा घेतला. या आढावा बैठकीत राज्यभरातील एचआयव्ही प्रतिबंध, उपचार आणि जनजागृतीसंबंधी उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.या बैठकीत राज्यातील सध्याच्या एचआयव्ही परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर उपचार पद्धती, जनजागृती मोहिमा आणि संवेदनशील समुदायांपर्यंत प्रभावी सेवा पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आगामी काळात अधिक परिणामकारक व प्रभावीपणे राबवावी. तसेच एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी कार्यरत यंत्रणांची कार्यक्षमता वाढवणे, विविध स्तरांवर समन्वय साधणे आणि जनसामान्यांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.या बैठकीस महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ.सुनिल भोकरे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.