पुणे : पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्यूटी संपवून घरी जात असताना दोघांनी पोलिसांवर कोयत्याने वार केला. पुण्यातील लॉ कॉलेजरोडवर काल (5 ऑक्टोबर) रात्री 1 वाजताच्या सुमारास सदर घटना घडली. त्यामुळे पुण्यात आता पोलीसचं असुरक्षित आहे की काय?, असा प्रश्न उपस्थित होतोय.
पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यातच आता पोलिसांवरच हल्ल्यांच्या घटना घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे, याची झलक पुन्हा एकदा दिसली आहे. रविवारी मध्यरात्री डेक्कन परिसरात गुन्हे शाखा युनिट-३ मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमोल काटकर (बकल क्र. 7835) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना लॉ कॉलेज रोडसमोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसारड्यूटी संपवून घरी जात असताना रविवारी रात्री 1 च्या सुमारास लॉ कॉलेजरोडवर बाईक वरुन जाणाऱ्या दोघांनी गुन्हे शाखा युनीट-3 मध्ये काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. प्राथमिक माहितीनुसार कट मारल्याच्या वादात हा प्रकार घडला आहे. या घटनेत काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांना पोलीस शोध घेत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
प्राथमिक तपासात ‘कट मारल्याच्या’ वादातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून डेक्कन पोलीस ठाण्याने त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.