सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! कार्यकर्त्यांना संधी; ZP मध्ये 5 अन् पंचायत समितीमध्ये 2 स्वीकृत सदस्य घेणार? मुख्यमंत्र्यांना पत्र
  • बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
  • : वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं, राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसमोर निवडणूक आयोगाला धडाधड प्रश्न
  • मतदान कुणाला जातं हेच कळतं नाही; उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला रोखठोक सवाल
 विश्लेषण

एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

डिजिटल पुणे    08-10-2025 11:45:37

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कामगारांच्या विविध मागण्या आहेत. त्या रास्त असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कामगार संघटना सोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले.

बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, विविध संघटनांचे संदीप शिंदे, समीर मोरे, श्रीरंग बरगे, हनुमंत ताटे, प्रकाश निंबाळकर, मुकेश तिगोटे, प्रदीप धुरंधर यांच्यासह एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, कामगारांचे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व अन्य थकीत भत्ते, तसेच दिवाळी सण अग्रिम देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. २०१८ पासून कर्मचाऱ्यांची उपरोक्त स्वरुपाची आर्थिक देणी प्रलंबित आहेत. त्यासाठी सुमारे ४४०० कोटी रुपये लागणार आहेत.

मंत्री सरनाईक म्हणाले, प्रत्येक वेळेस शासनाकडे निधी मागणी योग्य नाही, त्याकरता एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. कार्यभार स्वीकारल्यापासून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जाहिरातीच्या माध्यमातून वर्षाला सुमारे १०० कोटी रुपये, आधुनिक पार्सल सेवेच्या माध्यमातून वर्षाला १०० कोटी तसेच महामंडळाच्या बस आगारात असलेले पेट्रोल पंप सध्या केवळ महामंडळाच्या बसेस करिता इंधन पुरवठा करतात. भविष्यात हे पेट्रोल पंप व्यावसायिक स्वरूपात सुरू करण्यात येत आहे. याद्वारे वर्षाला २०० ते २५० कोटी रुपये मिळतील. अशा प्रकारे वर्षाला ५००-६०० कोटी रुपयांची उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. याबरोबरच उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळाचे स्वतःचे प्रवासी ॲप विकसित करण्यात येत आहे, यामधूनही ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविण्यात येणार आहे.

पीपीपी तत्त्वावर एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये कामगारांना सदनिका व विश्रामगृह बांधण्याचे देखील प्रयोजन आहे. त्यातून कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सार्वजनिक-खासगी भागिदारीतून होणाऱ्या प्रकल्प विकासातून महामंडळाची स्थावर मालमत्ता विकसित होईलच त्याचबरोबर वर्षाला एक ते दीड हजार कोटी रुपये उत्पन्न देखील मिळणे अपेक्षित आहे.

पुढील वर्षी अखेरपर्यंत आठ हजार नवीन बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. महामंडळाकडे एकूण १८ ते २० हजार बस संख्या करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्याची परवानगी मागितले आहे. तथापि, ती मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात करार पद्धतीने कामगार भरती करण्यात येणार आहे. ही व्यवस्था वाढीव बसेसमधून प्रवाशांना सेवा देण्यासाठी करण्यात येईल. त्यामधून निश्चितच उत्पन्न वाढणार आहे, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.यावेळी कामगार संघटनाच्या प्रतिनिधीसोबत त्यांच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी विस्तृत चर्चा केली.


 Give Feedback



 जाहिराती