सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडताहेत, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
  • केवायसीला गावात नेटवर्क नाही, 'लाडक्या बहिणींना' सातपुड्याचा डोंगर चढून घ्यावा लागतोय सिग्नलचा शोध, झाडांच्या फांद्यांवर फोन अडकवतात
  • कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद! कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार मास्टरमाईंड निघाला
 व्यक्ती विशेष

निलेश घायवळला परदेशात पळून जाण्यासाठी राम शिंदेंची मदत ; रोहित पवारांचा गंभीर आरोप

डिजिटल पुणे    09-10-2025 14:40:49

मुंबई : परदेशात फरार झालेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांशी घनिष्ट संबंध असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. निलेश घायवळ हा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या जवळचा आहे. राम शिंदे यांनी ओपन मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी निलेश घायवळचा उपयोग केल्याची चर्चा आहे. राम शिंदे यांनीच निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली. राम शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना फोन करुन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली असावी. अथवा गृहमंत्रालयातून त्यासाठी योगेश कदम यांच्यावर दबाव आला असावा, असा आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

निलेश घायवळच्या भावाला गुन्हेगारी रेकॉर्ड असूनही बंदुकीचा परवाना देण्यात आला. एरवी व्यापाऱ्यांना गरज असूनही बंदुकीचा परवाना सहज मिळत नाही. पण गुंडाच्या भावाला सहजपणे बंदुकीचा परवाना मिळत असेल तर यामध्ये वरिष्ठ स्तरावरील लोक गुंतले आहेत. त्यामध्ये राम शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असू शकतो, असेही रोहित पवार म्हणाले.

एरवी सर्वसामान्य लोकांना पासपोर्ट मिळवण्यासाठी बरेच खेटे मारावे लागतात. पण गंभीर गुन्हे दाखल असलेल्या निलेश घायवळ याला खोट्या नावाने पासपोर्ट दिला जातो. यानंतर तो भारत सोडून परदेशात गेला. निलेश घायवळ अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला गेला असावा. त्यासाठी धाराशिवच्या नेत्याने आणि राम शिंदे यांनी त्याला मदत केली असावी. गौतमी पाटील अपघाताच्यावेळी गाडीत नसूनही भाजपचे मंत्री तिला उचलायची भाषा करतात. मग इतक्या मोठ्या गुंडावर कारवाई का केली जात नाही? हा निलेश घायवळ बड्या नेत्यांच्या निवडणूक प्रचारात दिसतो. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील हे निलेश घायवळ याचे निकटवर्तीय आहेत. या दोघांचे फोटो आणि संभाषणाच्या क्लीपही आहेत. समीर पाटील यांनी निलेश घायवळ याला बऱ्याचदा मदत केली आहे. हे सरकार गुंडांना पाठबळ देते. हे सरकार गुंडांचं आणि कंत्राटदारांचं आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

राम शिंदे, संतोष बांगर हे निलेश घायवळ याला सहजपणे अधिवेशनात घेऊन येतात. या गुंडाला आत येण्याची परवानगी कशी मिळते? हे गुंड येऊन रिल काढतात. तानाजी सावंत यांचा याप्रकरणाशी थेट संबंध नसला तरी त्यांच्या कुटुंबातील लोक यामध्ये गुंतले आहेत. जिथे पवनचक्की आहे, तिकडे शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्यात आल्या. त्यामध्ये निलेश घायवळ याचा सहभाग होता. भ्रष्टाचार आणि गुंडांच्या बाबतीत पुणे शहर एक नंबरला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

 


 Give Feedback



 जाहिराती