सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! कार्यकर्त्यांना संधी; ZP मध्ये 5 अन् पंचायत समितीमध्ये 2 स्वीकृत सदस्य घेणार? मुख्यमंत्र्यांना पत्र
  • बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
  • : वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं, राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसमोर निवडणूक आयोगाला धडाधड प्रश्न
  • मतदान कुणाला जातं हेच कळतं नाही; उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला रोखठोक सवाल
 DIGITAL PUNE NEWS

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

डिजिटल पुणे    11-10-2025 11:04:08

मुंबई : राज्यातील महिला खेळाडूंसाठी शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ आणि सुरक्षा-सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा महिला खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काही दिवसांपूर्वी दादर जिमखानाच्या नूतनीकरण उदघाटनप्रसंगी महिलांना क्रीडांगणावर सुरक्षित व आदरयुक्त वातावरण मिळालेच पाहिजे, त्यासाठी देशभरातील क्रीडा संकुलात महिलांना चेंजिंग रुमची सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल आवाहन केले होते.या आवाहनाला तत्काळ व सकारात्मक प्रतिसाद देणारे अॅड. माणिकराव कोकाटे हे देशातील पहिले मंत्री ठरले आहेत.क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले की, राज्यभरातील महिला खेळाडूंना सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना तातडीने राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका आणि स्थानिक क्रीडांगणावर या सुविधा प्राधान्याने उभारल्या जातील.

चेंजिंग रूममध्ये स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा आणि आवश्यक सुरक्षिततेसाठी मर्यादित क्षेत्रात सीसीटीव्ही देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुनी इमारत दुरुस्त करणे अथवा नवीन चेंजिंग रूम बांधण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे केवळ सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तर महिलांचा सहभाग आणि विश्वास क्रीडा क्षेत्रात वाढीस लागेल.

मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक मुलगी आता अभिमानाने मैदानात उतरेल. तिच्या प्रत्येक यशामागे सुरक्षित आणि सन्मानित वातावरणाचा मजबूत पाया असेल. या निर्णयामुळे राज्यातील महिला खेळाडूंसाठी एक नवा अध्याय सुरू होणार असून, महाराष्ट्र महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक पुढचा टप्पा पार करत आहे.


 Give Feedback



 जाहिराती