पुणे : कोथरुड मतदारसंघातून सुरू झालेल्या, दिव्यांग मुले आणि पालकांसाठी कार्यरत ‘उमेद फाउंडेशन’ च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच, संस्थेचे संस्थापक राकेश सणस यांनी लिहिलेल्या ‘आक्रंदन’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पुण्यातील उमेद फाऊंडेशन ही संस्था समाजातील दिव्यांग मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. समाजातील दुःखाला सावरणारी अशी संस्था हेच देवकार्य आहे. अशा संस्थांना मदत आणि साथ देणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी उमेद फाउंडेशनतर्फे दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांसाठीच्या बालक-पालक प्रकल्पाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग मुलांच्या पालकांना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास रा. स्व. संघाचे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, सुहासराव हिरेमठ, स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी, तसेच उमेद फाउंडेशनचे राकेश सणस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
