मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना रुग्णालात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप मधील फोर्टिस रुग्णालयात राऊत यांच्यावर उपचार सुरु आहेत. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टीज हॉस्पिटल मध्ये आपली रक्त तपासणी केली होती. त्यांना घशाचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.काही तासांपूर्वीच, राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांच्याबद्दल मोठे विधान केले होते. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. मात्र, याचा अर्थ तो निर्णय नाही.या राज्यात प्रत्येकाचे एक स्थान आहे. जसे शिवसेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, शरद पवार साहेबांचे, डाव्या पक्षांचे तसेच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे. शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणे गरजेचं आहे. ही सर्वांचीच भूमिका असून राज ठाकरेंची सुद्धा तीच भूमिका असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
सकाळीच संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, असं वक्तव्य केलं. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये संजय राऊतांनी मोठी भूमिका बजावली आहे. तसेच, गेल्या कित्येक दिवसांपासून संजय राऊत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत सातत्यानं वक्तव्य करत आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूनं पक्षाची भूमिकाही प्रभावीपणे मांडत आहेत.
संजय राऊत हे शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून संजय राऊत हे सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आणि विरोधकांवर आगपाखड करण्याचे काम संजय राऊत एकहाती करत असतात. दररोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडतात. राऊतांच्या या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी महायुतीने अनेक नेत्यांची फौज तैनात केली होती. मात्र, संजय राऊत या सर्व नेत्यांना पुरुन उरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
संजय राऊत यांना आज अचानक रुग्णालयात का दाखल केले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आता डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत काय माहिती देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.