मुंबई : वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात १५ नोव्हेंबरपर्यंत टॅक्सी, रिक्षा चालकांना मीटरवर आधारित सेवा सुरू करण्यासाठी मुदत देण्यात येत आहे. या क्षेत्रात मीटरवर आधारित टॅक्सी, रिक्षा सेवा १५ नोव्हेंबरपासून सुरू करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात वसई – विरार महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते.बैठकीस आमदार स्नेहा दुबे, एस.टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वसई – विरार महानगरपालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर आदी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात शेअर टॅक्सी सेवेला परवानगी आहे. टॅक्सी, रिक्षा चालकांनी प्रवाशांची लुबाडणूक करू नये, प्रवाशांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रातून महामंडळाने ठाणे, कल्याण मार्गावर लांब पल्ल्याची बस सेवा सुरू करावी. प्रवाशी संख्या लक्षात घेता शहर बस वाहतूक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. महापालिका क्षेत्रात असलेल्या महामंडळाच्या जागांचा पार्किंग जागांसाठी उपयोग करावा, यासाठी जागा लागल्यास महानगरपालिकेने जागेचे नियोजन करावे, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.
वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या विरार, वसई, नालासोपारा येथे बस डेपो सुरू करावेत. नागरिकांना परिवहन सेवा सुलभरित्या मिळावी, याबाबत महानगरपालिकेने कार्यपद्धती ठरवून अंमलबजावणी करावी, असे निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.