नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज सर्व यंत्रणांच्या पूर्व तयारीचा आढावा घेवून व्यवस्थेबाबत नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपाच्या सहआयुक्त वसुमना पंत, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी, अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अधिवेशनासाठी येणारे मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी आवश्यक निवास व्यवस्था आणि वाहन व्यवस्थेसंदर्भात विषय निहाय सविस्तर चर्चा झाली. या दोन्ही व्यवस्थांनी चोख नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या तसेच दूरध्वनी, इंटरनेटची अद्ययावत व्यवस्था उभारण्याच्या सूचना बिदरी यांनी केल्या.अल्पोपहार व भोजन व्यवस्था देताना खाद्य पदार्थांचे प्रमाणीकरण व योग्य नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
सुयोग येथे फक्त पत्रकारांची निवास व्यवस्था तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था वनामती येथे करण्यास याबैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्ताविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वच्छता, पाणी पुरवठा व अग्निशमन व्यवस्था,आरोग्य व औषधीय सेवा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात येणारी हिवाळी अधिवेशन संपर्क पुस्तिका आदी विषयांवरही चर्चा झाली.