मुंबई : मनसे सोबत युती असो किंवा मनसे काँग्रेस सोबत येणार असल्याचा निर्णय असेल खा.संजय राऊत स्वतःच उबाठा गटातर्फे घोषणा करत आहेत. पगारी नेते संजय राऊतांनी उद्धव ठाकरे गटाचा पक्षप्रमुख म्हणून स्वतःच्या नावाची घोषणा केल्याबद्दल खा.राऊत यांचे अभिनंदन, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी खा. संजय राऊत यांची खिल्ली उडवली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री.बन म्हणाले की, उद्धव ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी तर राहुल गांधी यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत, असे राऊतांनी जाहीर केले आहे. याचा अर्थ राऊत हे पक्षप्रमुख या नात्याने तर उद्धव ठाकरे प्रदेशाध्यक्ष या नात्याने खर्गे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत, असा आव राऊतांनी आणला आहे. राऊतांनी उबाठा गटाचा ताबा घेतला असून त्यांच्या पक्षप्रमुख कार्यकाळात पक्षाची प्रगती होवो अशी खोचक टिप्पणीही श्री.बन यांनी केली.
यावेळी श्री.बन म्हणाले की, उबाठा आणि मविआचा निवडणुकीत पराभव झाला की ईव्हीएम वर शंका घेत, मतचोरीचा गावभर बोभाटा करतात. मात्र यांना जेव्हा अधिक जागा मिळतात तेव्हा ईव्हीएम चोख काम करत असते. मतचोरी होत नाही. हा निव्वळ ढोंगीपणा असून निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ घेऊन जाण्याआधी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी 5 प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अन्यथा मतचोरी नाही तर तुम्हा सर्वांची मती चोरीला गेलेली आहे हे स्पष्ट होईल असे आव्हान श्री. बन यांनी दिले.
· विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर अचानक ‘मतचोरी’ का आठवली?
· मविआ जिंकली तर ईव्हीएम बरोबर, भाजपा जिंकली तर ईव्हीएमवर शंका हा ढोंगीपणा लोकशाहीसाठी योग्य आहे का?
· निवडणूक प्रक्रियेवर एवढीच शंका असेल तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे खासदार आणि आमदार राजीनामा देणार आहेत का?
· लोकशाहीच्या नावाने गळा काढणारी मविआ लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी काही करणार की फक्त नौटंकी करणार ?
· जनतेच्या निर्णयावर शंका घेऊन महाविकास आघाडी महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान का करते?
असे पाच सवाल करत श्री.बन यांनी राऊत आणि मविआ च्या नेत्यांवर निशाणा साधला.
लोकशाहीच्या नावाने गळा काढणारे मविआ चे नेते आणि कार्यकर्ते जनतेमध्ये जात नाहीत तर थेट निवडणूक आयोगाकडे जातात. हिंमत असेल तर जनतेमध्ये जा जनता जनार्दन तुम्हाला जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही अशी टीका श्री. बन यांनी केली.
दुटप्पी संजय राऊत
कालपर्यंत अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हावे असे म्हणणा-या राऊतांची भूमिका आज साफ पालटली. आज ते म्हणतात की अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे शिवसेना हे दोन पक्ष ते मानतच नाहीत. राऊतांनी एका भूमिकेवर तरी कायम रहावे, दुतोंडी गांडुळासारखे दोन्ही बाजूंनी बोलू नये. लोकसभेला तुमची वेगळी भूमिका विधानसभेला तुमची वेगळी भूमिका अशा पद्धतीचे ढोंगी राजकारण आणि दुटप्पी राजकारण करू नका असा इशाराही श्री.बन यांनी दिला.
निवडणूक आयोगावर शंका म्हणजे संविधानावर प्रहार
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे प्रामाणिक आहेत त्यांच्यावर शंका म्हणजे संविधानिक संस्थांवर हल्ला आहे. शरद पवारांनी याआधी कधीही संविधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उभं केले नाही. मग मविआतील घटक पक्ष शंका का घेत आहेत असा सवाल श्री. बन यांनी केला.