मुंबई : मुलींच्या सक्षमीकरणाला आणि त्यांच्या मानसिक बळकटीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला आयोग तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिवस’ आणि ‘पोषण माह’ सांगता कार्यक्रम महाराष्ट्र स्टेट वुमेन्स कौन्सिल, आशासदन, उमरखाडी येथे उत्साहात संपन्न झाला.
“मी मुलगी आहे, मी बदलत आहे : संकटाच्या आघाडीवर असलेल्या मुली” या २०२५ वर्षातील संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, पोद्दार रुग्णालयाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. ऋतुजा गायकवाड यांनी पोषण विषयक मार्गदर्शन केले.
आशा सदन संस्थेमध्ये महिला व बालविकास विभागांतर्गत बालगृह, आधारगृह आणि विशेष दत्तक संस्था या योजना राबवल्या जातात. येथे ० ते ७ वर्षे वयोगटातील बालके तसेच १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुली बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार दाखल होतात. या बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सेवा, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांची सोय करण्यात आली आहे. नर्सिंग, बी.एस.डब्ल्यू., हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी अभ्यासक्रमांत त्यांना संधी दिली जाते. ० ते ७ वर्षे वयोगटातील अनाथ बालकांना योग्य कुटुंबात दत्तक दिले जाते, तर १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना आधारगृहात ठेवण्यात येते किंवा योग्य नोकरी मिळवून देऊन त्यांची ग्रुप होममध्ये बदली केली जाते, अशी माहिती उपसचिव डॉ. बैनाडे यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान बालगृहातील ७० मुले, दत्तक संस्थेतील १४ बालके, आधारगृहातील २८ मुली उपस्थित होत्या. एकूण ३५ प्रवेशिका कार्यक्रमासाठी सहभागी झाल्या. या कार्यक्रमाद्वारे महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली आणि पोषणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
पोषण अभियानाच्या अनुषंगाने बालिका, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनपान देणाऱ्या मातांमध्ये पोषणविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात आले.कार्यक्रमात मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि सबलीकरणासाठी विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेत नव्याने दाखल बालिकांचे नामकरण आणि कन्यापूजन करण्यात आले.