मुंबई : ‘महाराष्ट्रातील संगीत वाद्य’ या विषयावर आधारित ‘वाद्यमंथन’ या ११० वाद्यांचा परामर्श घेणाऱ्या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. “वाद्यमंथन” या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वाद्यांची जनतेस वेगळी ओळख होईल, असे प्रतिपादन यावेळेस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्रातील ७५ वाद्यांचे प्रदर्शन आणि सादरीकरण कार्यक्रम पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमादरम्यान विभीषण चवरे लिखित “वाद्यमंथन” या ई -पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. “वाद्य मंथन” या ई पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील ११० वाद्यांची सचित्र ओळख आहे. वाद्य कोणत्या प्रकारातील आहे, कधी वाजवले जाते, याची रचना कशी आहे, याचा सांस्कृतिक उपयोग कसा आहे, याचाही ऊहापोह यात करण्यात आलेला आहे. यामध्ये अनेक लोक वाद्यांचा समावेश आहे. त्या लोकवाद्यांमध्ये टिमकी, टिंगरी, डेरा, हिरोबाई किंगरी, डकलवार किंगरी, बिगुल, भेर, किल्लेतोंडा, तारपा, पागई, घाटोळी, घांगळी, चोंगा, मंदल, मंदारी, पिरी, ढाक, डहाका, सुरसोटा, गादली, शिंग पेपा, तुरंबा, धुम्मस, डवर, पावरी, दिमडी, गुडगुडी, घुमट, करताल, टप्पा, चिटकुरी, घाटी, खैताळ, रेला, टिंगरी, तिबुली, डोना, घोळकाठी, तटकली, मादळ, गुबूगुबू ढोल, खालुबाजा, कहाळे, तुंबडी अशा वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा समावेश आहे. संबळ, सनई, चौघडा, सुंदरी, वेगवेगळ्या प्रकारचे ढोल, भोंगा, पिपाणी, पायपेटी, पखावज, हलगी ताशा, चोंडके, ढिंगी, सारंगी, तुणतुने, तुर अशाही वाद्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राची कला व संस्कृती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून यातील अनेक घटक हे नव्याने प्रेक्षकांसमोर यायला हवेत, असे प्रतिपादन ॲड. आशिष शेलार यांनी यावेळेस केले. “वाद्य मंथन” या ई-पुस्तकाचा उपयोग विद्यार्थी, अभ्यासक, कलाकार व रसिकांना नक्कीच होईल असा विश्वासही त्यांनी या वेळेस व्यक्त केला. यापुढेही महाराष्ट्राच्या दुर्मिळ संस्कृतीचे दस्तऐवजीकरण करण्यात येईल असेही ॲड. आशिष शेलार यांनी प्रतिपादन केले.
या पुस्तक प्रकाशनसमयी व्यासपीठावर वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मुख्य पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंह, संचालक विभीषण चवरे, पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, सहसंचालक श्रीराम पांडे, तेजस्विनी आचरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.