मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ‘वाद्यरंग’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते दुर्मिळ व पारंपारिक वाद्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रदर्शनामध्ये अनेक दुर्मिळ वाद्य ठेवण्यात आली होती. यामध्ये डक्कलवारांची किंगरी, मसनजोगींचे घाटोळे, आदिवासींची घांगळी, आदिवासींचा डेरा, हिरोबाई किंगरी, जोगी किंगरी, टिमकी, तंबोरी अशा वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा समावेश होता. वाद्यरंग या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त कलाकारांनी आपल्या दुर्मिळ व पारंपरिक वाद्यांची कला प्रेक्षकांपुढे सादर केली. ढोलकीवादक कृष्णा मुसळे यांच्या जुगलबंदीने या कार्यक्रमात रंगत आणली. हे प्रदर्शन दिनांक १४ आक्टोंबर, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० ते ९:०० या कालावधीत कलांगण, रविंद्र नाटयमंदीर, प्रभादेवी येथे भरविण्यात आले होते.
या कार्यक्रमास वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग, पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक श्रीमती मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.