नायगाव : आखिल भारतीय सांस्कृतिक संघ संचलित ग्लोबल कौन्सिल फॉर आर्ट अँड कल्चर तसेच युनेस्को तर्फे थायलंड येथे आयोजित १५व्या कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉरमिंग आर्ट्स स्पर्धेत नायगाव (ता. कळंब) येथील डॉ. वैशाली हरिश्चंद्र गोरे यांचा सुपुत्र ईशान गोरे याने आपल्या टीमसह उत्तुंग यश संपादन केले आहे.
थायलंडच्या चोनबुरी शहरातील बुराफा विद्यापीठात दि. २५ ते २९ ऑक्टोबर दरम्यान ही आंतरराष्ट्रीय कलास्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विविध देशांतील वयोगटानुसार २५० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग होता. ज्युनिअर, सीनिअर, युथ आणि खुला गट अशा प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.
ईशान गोरे याने खुल्या गटातील "कॉन्टेम्पररी" नृत्यप्रकारात सहभाग घेतला होता. त्यांच्या टीमने नरसिंहा–विष्णू भक्तीपर गाण्यावर मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले. या नृत्यात ईशानने कृष्ण आणि हिरण्यकशपू या दोन प्रभावी भूमिका साकारल्या. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे या टीमने रौप्यपदक पटकावले.
ईशानच्या समूहात राजवर्धिनी, स्वरा, तरुण, आरोही, प्रिशा, आदिती, श्लोक आणि साराक्षी हे सहकारी कलाकार सहभागी होते. या सर्वांना नृत्य मार्गदर्शक भक्ती जाधव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
नायगाव व परिसरातून ईशान गोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक पातळीवर या यशामुळे अभिमानाची भावना निर्माण झाली असून, या तरुण कलावंताचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ईशान आणि त्यांच्या टीमचे हार्दिक अभिनंदन