मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचत विश्वविजेतेपद पटकावले असून, त्यांच्या या अभूतपूर्व यशाने संपूर्ण देशाचे मस्तक अभिमानाने उंचावले असल्याच्या भावना व्यक्त करत क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विश्वकप विजेत्या महिला क्रिकेट चमूला शुभेच्छा दिल्या. संपूर्ण देशभरात भारतीय नागरिक तिरंगा हाती घेऊन अभिमानाने विश्वविजयाचा आनंद साजरा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मंत्री ॲड. कोकाटे यांनी संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, “संधी मिळाली तर भारतीय मुली जग जिंकू शकतात, हे आपल्या महिला खेळाडूंनी सिद्ध करून दाखवले आहे.”
‘क्रिकेट इज अ जेंटलमन्स गेम’ ही संकल्पना आज आपल्या रणरागिणींनी मोडीत काढली, असे सांगत ते म्हणाले की या विजयी महिलांनी जगाला दाखवून दिलं की जेंटलवूमनमध्ये देखील क्षमता, गुणवत्ता आणि संघर्षपूर्ण समानता आहे.भारतीय स्त्रिया आता चूल आणि मूल यापलीकडे जाऊन कर्तृत्वाच्या नव्या सीमारेषा गाठत आहेत. महिला क्रिकेट संघाच्या या विजयाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की भारतीय मुली कोणत्याही अर्थाने मुलांपेक्षा कमी नाहीत. त्या अधिक जिद्दी, जाज्वल्य आणि समर्थ आहेत, असेही क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे यांनी म्हटले आहे.