पुणे – पुण्यात पुन्हा एकदा भोंदूबाबाच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या दोन लहान मुली बऱ्या होतील या आशेने एका आयटी इंजिनिअर आणि त्यांच्या शिक्षक पत्नीने भोंदूबाबावर विश्वास ठेवला, मात्र त्याच भोंदूने त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तब्बल १४ कोटी रुपयांना गंडा घातला.
पुण्यात एका आयटी अभियंत्याला त्याच्या दोन्ही मुलींना बरं करण्याच्या आमिषाने तब्बल १४ कोटी रुपयांना भोंदू बाबाने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शंकर महाराज त्यांच्या अंगात येतात आणि ते कोणताही आजार बरा करू शकतात, असा दावा करून या भोंदू बाबाने पीडित दांपत्याची दिशाभूल केली. दिपक डोळस असे फसवणूक झालेल्या आयटी अभियंत्याचे नाव असून, त्यांची पत्नी शिक्षक आहे. या दाम्पत्याची कोट्यावधींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येताच खळबळ उडाली आहे. या दांपत्याने आपल्या आयुष्यभराची बचत आणि इंग्लंडमधील घर,फार्म हाऊस देखील गमावले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव दिपक खडके असून, त्याला त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर हिने फसवणुकीत साथ दिल्याचे समोर आले आहे. या दोघांनी एकत्र येऊन डोळस दांपत्याला आध्यात्मिक शक्ती आणि उपचारांच्या नावाखाली जाळ्यात ओढले. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
दिपक डोळस (IT इंजिनिअर) आणि त्यांची पत्नी या दाम्पत्याला शंकर महाराज त्यांच्या अंगात येतात आणि कोणताही आजार बरा करू शकतात असा विश्वास देण्यात आला. दिपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर या दोघांनी मिळून ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.या पती-पत्नीने आपल्या दोन लहान मुली बऱ्या होतील या अपेक्षेने भोंदूबाबा आणि त्याच्या शिष्या जे सांगितील ते सर्व करत गेले. मात्र मुली बऱ्या होत नाहीत असं लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा दिपक खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या राहत्या घरात दोष असल्याचे सांगितले. मात्र आता राहण्यासाठी एकमेव घर उरले असल्याचं डोळस यांनी सांगितले आणि घर विकण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर डोळस यांना ते घर तारण ठेऊन घरावर लोन काढण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर पर्सनल लोन देखील काढायला लावलं. हा सगळा पैसा राजेंद्र खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांनी हडपला आणि त्या पैशातून कोथरुड येथील महात्मा सोसायटीत आलीशान बंगला खरेदी केला आहे.
श्रद्धेवर लुट
२०१८ पासून या दाम्पत्याला “मुली बऱ्या होतील” या आमिषाने जाळ्यात ओढण्यात आले. वेदिका पंढरपुरकर आपल्या अंगात शंकर महाराज येतात अशी अभिनय करायची आणि त्यानंतर दांपत्याला सांगायची “देव सांगतोय, तुमचं घर दोषपूर्ण आहे, ते विकून दान करा.”
घर, लोन आणि इंग्लंडमधील मालमत्ता विकायला लावली
डोळस दांपत्याने आपल्या आयुष्यभराची बचत, बँकेतील ठेवी, इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून त्याचे पैसे वेदिका व खडके यांच्या खात्यात RTGSद्वारे पाठवले. शेवटी पुण्यातील घरावर कर्ज काढण्यास देखील भाग पाडण्यात आले.
त्या पैशांत विकत घेतला कोथरुडमधील बंगला
या फसवणुकीतून मिळालेल्या पैशांत आरोपी दिपक खडके व वेदिका पंढरपुरकर यांनी कोथरूडमधील महात्मा सोसायटीत आलीशान बंगला विकत घेतला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या बंगल्यात अनेक कर्मचारी ठेवण्यात आले होते.
पोलीस तपास सुरु
या संपूर्ण प्रकरणाने पुण्यात खळबळ उडाली आहे. दिपक डोळस यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि जादूटोण्याच्या आरोपाखाली तपास सुरु आहे.
मुख्य मुद्दे:
IT इंजिनिअर व शिक्षक पत्नीला १४ कोटींनी गंडा
“शंकर महाराज अंगात येतात” या नावाखाली फसवणूक
इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकायला लावले
कोथरूडमध्ये खरेदी केला आलीशान बंगला
पुणे पोलिसांकडून सखोल तपास सुरू