उरण : उरण तालुक्यातील भेंडखळ येथील प्रसिद्ध विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्ताने भेंडखळ येथील जरीमरी आई नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने विठू माऊलीची पहाटे महापूजा करण्यात आली. त्याचबरोबर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. विशेषता: कार्तिकी एकादशी निमित्ताने मोठी बाजारपेठ भरली होती. यामध्ये खेळणी, पाळणी, प्रसाद व हार फुलांची दुकाने थाटण्यात आली होती. या विक्रेत्यांना खास जरीमरी आई नवरात्र उत्सव मंडळाच्या सौजन्याने अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. हा अन्नदानाचा उपक्रम गेल्या नऊ वर्षापासून जरीमरी आई नवरात्र उत्सव मंडळाच्या सौजन्याने अखंडित सुरू असल्याची माहिती या गो दांड्यावरणाचे निर्माते दत्ता भोईर यांनी दिली. दरम्यान मंडळाचे अध्यक्ष किरण अनंत घरत. उपाध्यक्ष जन्मेंजय भोईर, रेखा ठाकूर सचिव अक्षय भोईर, कौशिक भोईर, प्रा.प्रांजल भोईर, प्रा.भूषण ठाकूर, राजेश द्वारकानाथ ठाकूर, प्रथम घरत, संकेत ठाकूर, उमंग भोईर यांनी या अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी आरपीचे उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर, व्यवसायिक वाद्यवृंद निर्माते दत्ता भोईर, फ्रेंड्स सामाजिक कलामंचाचे अध्यक्ष चंद्रविलास घरत, मनसे अध्यक्ष राकेश भोईर या सर्वांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. हा कार्यक्रम स्तुत्य असल्याचा अभिप्रायही त्यांनी यावेळी दिला.