सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचा आरोप, आता देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणाची माहिती मागवली; पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार?
 विश्लेषण

अजित पवारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

डिजिटल पुणे    06-11-2025 17:43:10

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त ५०० रुपये दिली आहे.सरकारच्या ताब्यात असणा-या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच कसा? असा प्रश्न विचारून भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे म्हटले आहे की, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची अमेडिया नावाची कंपनी असून या कंपनीने कोरेगाव पार्क भागातील जमीन अत्यंत अल्प किंमतीत घेतली आहे, ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या अमेडिया कंपनीचे भागभांडवल फक्त १ लाख रुपये आहे. अमेडिया कंपनीला या जागेत आयटी पार्क उभारायचे आहे आणि त्यास सरकारच्या उद्योग संचालनालयाने अवघ्या ४८ तासात मंजुरीही दिली. सरकारच्या ताब्यात असलेली वतनाची जमीन विकत घेता येते का ? स्टॅम्प ड्युटी माफ का केली? असे प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित करून हा व्यवहार रद्द करावा व संपूर्ण व्यवहाराशी संबंधित अधिका-यांना तात्काळ निलंबित करून सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ‘सारखं मोफत कसं मागता, जरा हातपाय हलवा’ असा दम शेतक-यांना देणाऱ्या अजित पवार यांच्या दिवट्याच्या जमीन व्यवहारात तब्बल २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना अजित पवारांना वेदना का होतात, हे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं’, असा प्रकार असून हा व्यवहार एक मोठा स्कॅम आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.


 Give Feedback



 जाहिराती