नाशिक : नाशिक जिल्ह्यात तलावांची संख्या अधिक असून मत्स उत्पादनासाठी अधिक संधी आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून मत्स उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, मत्सव्यवसाय विभाग नाशिकचे प्रादेशिक आयुक्त ना. वि. भादुले, सहाय्यक आयुक्त नाशिक किसन वाघमारे, सहाय्यक आयुक्त जळगाव/अहिल्यानगर अतुल पाटील, प्रशासकीय अधिकारी अ. कु. शेजूळ, मत्सव्यवसाय विकास अधिकारी (नाशिक) ऋषिकेश ठाकरे, मत्सव्यवसाय विकास अधिकारी (अहिल्यानगर) प्रतिक्षा पाटेकर, सहाय्यक मत्यव्यवसाय विकास अधिकारी अ. सु. गवई, अमित स्वामी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले की, जिल्ह्यात तलावांची संख्या पाहता क्षमतेनुसार मत्सबीज उत्पादनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आधुनिक साधनसामग्रीच्या वापरासह अधिकाऱ्यांनी वेळोवेळी स्थळभेटी देणे गरजेचे आहे. मत्स उत्पादन वाढीच्या दृष्टीने मत्स व्यावसायिक, मत्स संघटना यांना मत्सव्यवसाय विभागाचे शासन निर्णय व योजनांची माहिती होण्यासाठी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी अभ्यास गट तयार करावेत त्यांनी लाभार्थी वाढण्यासाठी ठिकाठिकाणी शिबिरांच्या आयोजनासह योजनांविषयी जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या मत्सव्यावसायिकांचे नुकसानीचे पंचनामे करून मदत पुनर्वसन बाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. नाशिक शहरात सुसज्ज मच्छी बाजार उभारणीसाठी महानगरपालिकेच्या समन्वयातून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मंत्री राणे यांनी बैठकीत दिल्या