पुणे : पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी आणि तिचे पती सागर सुर्यवंशी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे १० कर्ज उचलून ४१ कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेतील या घोटाळ्याप्रकरणी सागरला सीआयडी, पिंपरी चिंचवड पोलीस आणि ईडीकडून अटक झाली होती, तर शीतलने अटकपूर्व जामीन मिळवला होता. यामुळे शीतलने केवळ जमीन व्यवहारच नव्हे, तर कर्ज प्रकरणातही फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या व्यावसायिक भागीदारीतील मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात नवीन वळण आलं आहे. या प्रकरणात पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचे कारण:
या सर्वांनी संगनमत करून शासनाचा ₹5 कोटी 89 लाख 31 हजार 800 रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप आहे. हा गुन्हा पुण्याचे निलंबीत तहसीलदार सूर्यकांत येवले, शीतल तेजवानी आणि मुद्रांक विभागातील अधिकारी रविंद्र तारू यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.मात्र, अमेडिया कंपनीत 99% भागीदारी असलेले पार्थ पवार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, तर केवळ 1% भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शीतल तेजवानी-सागर सूर्यवंशी प्रकरणाशी संबंध
या जमीन प्रकरणातील शीतल तेजवानी आणि तिचे पती सागर सूर्यवंशी यांच्यावर पूर्वीपासूनच गंभीर आरोप आहेत.त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्जे घेऊन तब्बल ₹41 कोटींची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.
या फसवणुकीचे मुख्य मुद्दे:
1.सागर व शीतल यांनी कुटुंबीयांच्या नावे एकूण 10 कर्जे घेतली.
2. सेवा विकास बँकेच्या पुणे व पिंपरी चिंचवड शाखांतून ही कर्जे उचलली.
3. कर्जे घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली.
4. घेतलेली रक्कम ज्या उद्देशासाठी घेतली, त्यासाठी न वापरता इतरत्र गुंतवणूक केली.
5. 2019 मध्ये सहकार आयुक्तांच्या ऑडिटमध्ये घोटाळा उघड झाला.
6. 2021 मध्ये सागर सूर्यवंशीला अटक, नंतर 2023 मध्ये ईडीकडून पुन्हा अटक.
7. ईडीने ₹45 कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.
पार्थ पवार जमीन व्यवहार नेमकं काय?
1. कोरेगाव पार्क येथील 40 एकर वादग्रस्त जमीन.
2. 1819 मध्ये ही जागा महार वतनदारांना देण्यात आली होती.
3. 1957 मध्ये ती सरकारकडून बोटॅनिकल डिपार्टमेंटला देण्यात आली.
4. 1962 नंतर ती जागा भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्राकडे भाडेतत्वावर.
5. 2006 मध्ये वतनदारांकडून शीतल तेजवानीला पॉवर ऑफ अटर्नी.
6. त्याच पॉवर ऑफ अटर्नीद्वारे शीतल तेजवानीने ही जागा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विकली.
या सर्व घडामोडींमुळे अजित पवार कुटुंबासाठी नवे राजकीय वादळ निर्माण झाले आहे.एकीकडे पार्थ पवारांचे नाव थेट गुन्ह्यात नसले तरी, त्यांच्या भागीदारीमुळे नैतिक आणि राजकीय जबाबदारीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.