पुणे: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धा पर्व-५’ आणि ‘पर्व-६’ या दोन्ही स्पर्धांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम दि.६ नोव्हेंबर २०२५ रोजी लोकमान्य सभागृह, नारायण पेठ, पुणे येथे दुपारी पार पडला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे उपस्थित होते .ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्रकुमार सराफ, उद्योजक पराग गाडगीळ, मराठी काका उर्फ अनिल गोरे, गणित संशोधक लक्ष्मण गोगावले,निर्मिती नामजोशी, नरसिंह भोईर,शशांक टिपणीस उपस्थित होते.
मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले आणि अंकनाद उपक्रमाच्या सातत्यपूर्ण यशाबद्दल माहिती दिली.पूजा जाधव, अश्विनी दातार यांनी सूत्रसंचालन केले.राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.आठ गटातील पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिक म्हणून अनुक्रमे ११ हजार,७ हजार आणि ५ हजार रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे यावेळी देण्यात आली. ‘अंकनाद’ अंतर्गत शिक्षकांसाठी आयोजित गणित विषयक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आणि पुणे महानगरपालिका शाळांमध्ये घेण्यात आलेल्या पाढे सात्मीकरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण देखील या कार्यक्रमात करण्यात आले. या स्पर्धेत महानगरपालिका व इतर शाळांमधील एकूण ३१ हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते, तर शिक्षकांसाठीच्या गणित विषयक व्हिडिओ स्पर्धेत ११० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमात विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. मराठी भाषेचे संवर्धन, गणित विषयातील भीती दूर करणे आणि शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान या उद्देशाने हा उपक्रम गेली सहा वर्षे यशस्वीपणे राबविला जात आहे. मराठीच्या प्रगतीसाठी कार्यरत राहू :डॉ.शामकांत देवरे
पारितोषिक वितरण समारंभानंतर मार्गदर्शन करताना डॉ. शामकांत देवरे म्हणाले,' सर्व महाराष्ट्रातून लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धेस प्रतिसाद मिळाला ही मोठी बाब आहे.मॅप एपिक चा पाढे प्रकल्प हा अतिशय स्तुत्य आहे.शासन नेहमी त्यांच्यासोबत राहील.गणिती शिक्षणाचे भारतीय ज्ञान राष्ट्रीय,जागतिक पातळीवर नेले जाईल.,यासाठी आम्ही मदत करू. ऑलिम्पियाड च्या धर्तीवर हा प्रकल्प राबविला जाईल. सत्वर आणि तत्पर राहून शासन काम करेल. माय मराठीची पालखी जागतिक पातळीवर दिमाखात नेली जाईल, यासाठी आपण सर्व प्रयत्न करू' .
'राज्य मराठी विकास संस्था मराठीच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे .भाषा संचालनालय,महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ ,विश्वकोश निर्मिती मंडळ,राज्य मराठी विकास संस्था हे चार शासकीय विभाग अत्यंत चांगले कार्य करीत आहेत.मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यापासून आम्ही विविध प्रकल्प राज्य,देश आणि जगाच्या पातळीवर करीत आहे.पुस्तकाच्या गावाची निर्मिती,कवितेच्या गावाची निर्मिती,बोलीभाषांची निर्मिती,ग्रामीण भागापर्यंत मराठीचे उपक्रम पोहोचविण्याचे काम राज्य मराठी भाषा विकास संस्था करत आहे.पाढे स्पर्धेतून ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्ञानाशी आणि मराठीशी जोडला जात आहे हे महत्वाचे आहे.असे कार्यक्रम मराठी भाषेशी संबंधित महत्वाच्या सर्व दिवशी ,महत्वाच्या ठिकाणी होतील याचे नियोजन करूया',असेही ते म्हणाले.अनिल गोरे ,सराफ यांनीही मनोगत व्यक्त केले.