मुंबई : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ऐतिहासिक वंदे मातरम् गीताच्या लिखाणास 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘वंदे मातरम् सार्ध शताब्दी महोत्सव’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्ला, मुंबई शहर व उपनगर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने उद्या ७ नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 ते 10.30 या कालावधीत ‘वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव’ कार्यक्रम होणार आहे. महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला या संस्थेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पारंपरिक खेळाच्या मैदान मैदानात हा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमासाठी खासदार वर्षा गायकवाड, आमदार पराग शाह जिल्हाधिकारी, तहसीलदार व अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात लघु नाटिकेच्या सादरीकरणाने होईल. त्यानंतर डॉ. प्रेरणा प्रमोद क्षीरसागर, राष्ट्र सेविका समिती कोकण प्रान्त बौद्धीक प्रमुख यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ५ हजारांहून अधिक विद्यार्थी एकाच वेळी उपस्थित राहून वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन करणार आहेत.