सोलापूर:– ग्राम विकास विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या उमेद उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ जिल्हास्तरावर उपलब्ध व्हावी यासाठी रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल व उपहारगृह चे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आमदार सुभाष देशमुख हस्ते फित कापून करण्यात आले.या उद्घाटन कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे सह सर्व तालुका व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले की, जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादित खाद्यपदार्थांचे याठिकाणी रुक्मिणी शॉपिंग मॉलमध्ये विक्री होणार असून शासनाच्या या उपक्रमामुळे महिला बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना एक बाजारपेठ मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिला तसेच शहरी भागातील महिलांची आर्थिक उन्नती होणार होईल. तसेच सदर उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाला मार्केटिंग, पॅकेजिंग डिस्ट्रीब्यूशन याबाबत प्रशिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरासाठी सरकारच्या वतीने पुढाकार घेतला जाणार आहे. उमेद रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल व उपहारगृह उपक्रम कौतुकास्पद आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभा केलेला रूक्मिणी मिनी शॉपिंग मॉल व उपहारगृह हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
सोलापुर शहरातील पार्क चौक येथे रुक्मिणी मॉल व उपहारगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील पॅकेजिंग, लेबलिंग उत्तम असलेल्या 100 नाविन्यपूर्ण उत्पादने विक्री करिता ठेवण्यात आली आहेत.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी रूक्मिणी शॉपिंग मॉल व उपहारगृहाची संकल्पना सांगून उमेद मार्फत जिल्ह्यात राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. हा मॉल शुभदा महिला बचत गटाच्या सदस्यांना चालवण्यात देण्यात आलेला आहे.