सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
  • : माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, पुणे जमीन घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
  • 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
  • 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली? पुणे पोलिसांकडून शोधाशोध सुरु
  • पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
 जिल्हा

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक संपन्न

डिजिटल पुणे    08-11-2025 11:57:50

पुणे : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत ६ नोव्हेंबरपर्यंत झालेल्या नाव नोंदणीची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांसोबत बैठक घेण्यात आली. मतदार नोंदणी अधिकाधिक व्हावी यासाठी सर्व जिल्हाधिकारी तसेच राजकीय पक्षांनी प्रयत्न करावेत, असे डॉ. पुलकुंडवार म्हणाले.विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, राजकीय पक्षांचे जिल्ह्यातील प्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी, राजकीय पक्ष प्रमुख व प्रतिनिधी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूकीपूर्वी एक वर्ष आधी सुरु करण्यात आला आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत पुणे विभागातील 58 तालुक्यांमध्ये 564 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत नमुना क्रमांक 18 किंवा 19 द्वारे दावे स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक 6 नोव्हेंबरपर्यंत मागील निवडणूकीपेक्षा मतदार नोंदणी कमी प्रमाणात झाली आहे.

या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार याद्यांची मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी प्रसिद्धी, 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. या कालावधीतही मतदार नोंदणी करता येणार असल्याने प्रत्येक मतदाराने जागरुकतेने नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांमध्ये जागृती करावी. 25 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली करण्यासह पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येणार आहे. तसेच अंतिम मतदार यादी मंगळवार 30 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरही निवडणूक जाहीर होईपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक पात्र मतदारांची नाव नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्न व्हावेत. मतदार नाव नोंदणीच्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी त्यांच्या सूचना संकलित करुन सादर कराव्यात. त्या सूचना भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येतील, असेही डॉ. पुलकुंडवार म्हणाले.यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या.


 Give Feedback



 जाहिराती