नागपूर – योग ही आपली अतिशय प्राचीन अशी चिकित्सा पद्धती आहे. आज आपल्याला दैनंदिन तणावपूर्ण जीवन जगावे लागते. जीवन पद्धतीमुळे तयार झालेल्या आजाराचा मोठा प्रादुर्भाव आज समाजात पाहायला मिळतो. या आजारापासून दूर राहायचे असेल तर यावरील हमखास उपाय हा आपली योग पद्धती असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.रामनगर संघ मैदान येथील जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या वतीने मंडळाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसीय‘आंतरराष्ट्रीय योग संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष राम खांडवे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शिवानी दाणी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, योगामध्ये केवळ शरीराचा विचार करण्यात आलेला नाही. मनाचा, आत्म्याचा, सूक्ष्म शक्तीचा , चेतनेचा विचार करून योगासने तयार झाली आहेत. योगाच्या माध्यमातून उपचार शक्ती तयार होते. योगाकडे अतिशय प्रतिष्ठित उपचार पद्धती आणि व्यायाम पद्धती म्हणून पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेतून जागतिक योग दिनाची संकल्पना पुढे आली आणि जगभरातून यास मान्यता मिळाली. आज जगभरातल्या अनेक देशात योग दिन मोठ्या स्वरूपात साजरा केला जात असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
योगाभ्यासी मंडळाच्या आजवरच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या 75 वर्षापासून जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे अविरत कार्य सुरू आहे. सर्वांपर्यंत योग पोहोचला पाहिजे या दृष्टीने मंडळाने काम केले आहे. अनेक लोक इथे योग पारंगत झाले असून याचबरोबर योगाच्या माध्यमातून अनेक व्याधीतून बाहेर काढण्यास या मंडळाची मदत झाली असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.