सोलापूर – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत हत्तुर गाव, तालुका दक्षिण सोलापूर येथे ग्रामदैवत श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिराच्या विकास आराखड्याच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर गावात ब वर्ग देवस्थान श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर या ग्रामदैवताच्या विकासासाठी 3 कोटी 75 लाख रुपये निधीच्या विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावातील इतर विकास कामांसाठी 60 लाख रुपये निधीची कामाचे भूमिपुजन करण्यात आले, ज्यामुळे एकूण 4 कोटी 35 लाख रुपये निधीच्या कामांचे भूमिपूजन झाले.
यावेळी आमदार सुभाष देशमुख, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब पाटील, सरपंच सौ. ज्योतीताई कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना प्रत्येक गावातील जनता आपल्या ग्रामदैवतावर श्रद्धा ठेवते यावर भाष्य केले. त्यांनी हत्तूर गावाच्या पुल व रस्त्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली.तसेच, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबद्दल तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांचे आभार मानले की त्यांनी शेतकऱ्यांसाठी 31,500 कोटी रुपये निधी दिला आणि पावसामुळे व पुरामुळे खरडून गेलेल्या शेत जमिनीला 47,000 रुपये हेक्टरी मदतीचा निर्णय घेतला.
आमदार सुभाष देशमुख यांनी ग्रामदैवत श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर यांच्या विकासाबरोबरच गावातील इतर विकास कामांबद्दल बोलताना पालकमंत्री यांचे आभार मानले. त्यांनी गावचा शैक्षणिक व आर्थिक स्तर वाढवण्यासाठी विशेष लक्ष तसेच पर्यटनाच्या दृष्टीने ही गावाचा सर्वांगीण विकास साठी व कुडलसंगम या तिर्थ क्षेत्राच्या कामाला देण्याबाबत प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी केली.कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सामूहिक वंदे मातरम गीताचे गायन करण्यात आले.