सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
 राज्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला भेट

डिजिटल पुणे    15-11-2025 10:32:18

नवी दिल्ली : प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या ४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  भेट दिली. भारत व्यापार वृद्धी संस्थे (आयटीपीओ) मार्फत आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या  संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र दालनाची उभारणी केली आहे. हे दालन १०९८ चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले असून, त्याची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर आधारित आहे. १४ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा मेळा २७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.  यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्रा, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बळगन, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकर उपस्थित होते. दालनाचे उद्घाटन  सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दालनातील महाराष्ट्र राज्य हस्तकला आणि हातमाग महामंडळ, विविध स्वयंसहाय्यता गट, मराठी भाषा दालन, पैठणी कारागीर तसेच इतर स्टॉल्सची पाहणी केली. पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या वस्तू, घरसजावटीच्या वस्तू, हॅंड पेंटिंग, ऑरगॅनिक उत्पादने, काथ्यापासून बनवलेल्या वस्तू, खादी आणि बांबूच्या वस्तू तसेच बचत गटातील महिलांनी बनवलेले खाद्यपदार्थ आदी वस्तू प्रदर्शित करणाऱ्या स्टॉल्सना त्यांनी भेट दिली. स्टॉलधारकांशी संवाद साधून उत्पादनांची माहिती घेतली. तसेच पैठणी स्टॉलवर महिलांशी चर्चाही केली.

राष्ट्रीय राजधानीत राज्याच्या उत्कृष्ट उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी उद्योग विभागाच्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बळगन यांनी मेळा संकल्पना आणि उद्योग विभागाने केलेली कार्यवाही याची माहिती दिली.  निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी मेळाव्यात प्रदर्शित विविध उत्पादने व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.या मेळाव्यात झारखंडला फोकस राज्याचा दर्जा देण्यात आला असून, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांना भागीदार राज्य म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.


 Give Feedback



 जाहिराती